पहिली कविता आणि बक्षीस समारंभ
![]() |
माझं कवितेसाठी मिळालेलं पहिलं बक्षीस |
वर जी दिसते आहे न , तीच माझी पहिली-वहिली TROPHY.....
याचीच कथा सांगते आज तुम्हाला.
तर झालं असं की, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला १०० वर्षे पूर्ण झालयानिमित्त त्यांनी बालकवी संमेलनाचे आयोजन केले होते. मला याची माहिती अर्थातच शाळेतून मिळाली. "या स्पर्धेत भाग घ्यावा का?" माझ्या मनात संदेह होता, कारण 'कविता' मला अगदी नवखी होती. काही महिन्यांची ओळख होती आमची. अशावेळी तिच्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा , हे जरा अवघडच होतं. शेवटी स्पर्धा राज्यस्तरावरची होती. पण मी तयारी दाखवली आणि घरच्यांचाही पाठिंबा मिळाला; स्पर्धेत सहभागी व्हायचं निश्चित झालं.
मग सुरू झाली माझी कसरत . ' विषय काय घ्यावा? ' इथपासून सुरुवात . कविता लिहून शाळेत जमा करायला काही दिवसांचा अवधी दिला होता. मी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा कविता लिहायला खूप उत्साही होते. पण एक ओळ सुचेल तर शप्पथ! अखेर शेवटचा दिवस उजाडला. त्यदिवशी मला काहीही करून कविता लिहायची होती. दिवसभर डोक्यात तोच विचार घोळत होता. शेवटी संध्याकाळी मला दोन कडवे सुचले. पण त्यातही अडचण अशी होती की, कविता अजूनही अपूर्ण वाटत होती. मला काय करावं काही कळत नव्हतं.
रात्री जेवण झाल्यावर आई-बाबांसोबत मामाकडे भेटायला जायचे ठरले. तेव्हा माझ्या मनात अर्धवट राहिलेल्या कवितेचा विचार होता, पण मी तेव्हा इतकी बिनधास्त (खरंतर निष्काळजी 😁) होते की, उद्या सकाळी कविता पूर्ण करू, या भरोश्यावर मीसुद्धा त्यांच्यासोबत गेले. तिथे सगळ्या गप्पागोष्टी झाल्या आणि आम्ही उशिराने घरी यायला निघालो. माझ्या मनात पुन्हा कवितेचा विचार सुरू झाला. ( कविता अर्धवट राहिल्यावर अस्वस्थ होण्याची सवय मला तेवहापसूनच लागली बहुतेक.) मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते. finally एक भन्नाट कडवं मला सुचलं आणि मी लगेच आई-बाबांना ते ऐकवलं. मला अचानक हे कडवं सुचल्याने त्यांना आश्चर्य वाटत होतं. मी घरी पोहोचल्या-पोहोचल्या माझी वही काढली आणि मला सुचलेलं कडवं लिहून काढलं. घरी पोहोचेपर्यंत मी ते कडवं विसरू नये म्हणून त्याचा जप करत होते. नंतर ती कविता घरात सगळ्यांना दाखवली. दुसऱ्यादिवशी शाळेतल्या ताईंकडे सुपूर्त केली. माझा जीव भांड्यात पडला. आता बक्षीस मिळो अथवा न मिळो . माझी पहिलीच वेळ असल्याने मला कोणत्याही बक्षीसची अपेक्षा नव्हती. कविता लिहून झाल्याचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता.
लेखन- ईरा कुलकर्णी
If you want to read my award wining poem, stay tuned for part 2 of this blog!😊
Wah....mastach
ReplyDeleteWow, very well drafted
ReplyDeleteमस्तच 👌👌
ReplyDelete